Friday, August 7, 2015

अरेंज मॅरेज आणि लग्नासाठीचे फोटो



केवळ फोटो बघून आज लग्न ठरविले जात नाही आणि फोटो न बघता लग्नाच्या बोलणी सहसा पुढे सरकत नाहीत. सर्व-प्रथम फोटो बघून लग्नासाठीचा विचार केला  जाण्याचा काळ जरी कालचा झाला असला तरी आजही उत्तम आर्थिक परिस्थिती असलेली मुले, लग्नासाठी मुली बघताना ती सुंदर, गोरी, रूपवान असावी अशी अपेक्षा ठेवतात. अर्थात मुलींच्या (व त्यांच्या पालकांच्या) वाढलेल्या अपेक्षा बघता ही अपेक्षा जवळपास नाहीशी झाल्यासारखीच आहे. पण मग अरेंज मरेजमध्ये ‘लग्नासाठीच्या’ फोटोची काही भूमिका आहे का? असेल तर ती कितपत प्रभावी ठरते? आणि त्यासाठी काय उपाययोजना कराव्यात? ह्यासाठी आपलं माणूस विवाहसंस्था आपल्या सदस्यांना मार्गदर्शन करीत असते.

लग्नासाठी स्थळे बघताना मुली व त्यांचे पालक आज सर्वप्रथम शिक्षण आणि उत्पन्न ह्याबाबींकडे लक्ष देतात आणि त्यांच्या अटींची सुरवात तेथूनच होते. ह्या 2 मुख्य अटी पूर्ण करणाऱ्या मुलांच्या यादीत मग पहिला नंबर लागतो तो ‘मुलगा कसा आहे?’ ह्याचा. आणि त्यासाठी लागतो त्याचा परिणामकारक फोटो. अर्थातच त्याबरोबरीने  इतरही सर्व बाबींची शहानिशा क्रमाने होतेच. तशीच परिस्थिती असते मुले व त्यांचे पालक लग्नासाठी स्थळे बघताना. शिक्षण व उत्पन्न ह्या बाबतीत उजवे असणारे, मुली बघताना तिच्या शिक्षण व इतर बाबी तपासताना सुरुवात करतात ती मुलीच्या फोटोपासूनच.

मग ‘लग्नासाठीचे फोटो’ असावे कसे? त्याकडे विशेष लक्ष दिल्याने लग्न जमण्यात काही फारसा फरक पडणार आहे का? ह्याचे उत्तर अंशतः ‘हो’ असेच द्यावे लागेल. सुयोग्य व मनपसंत जोडीदार निवडताना प्राथमिक अपेक्षा प्रून केलेल्या स्थळांच्या यादीत अग्रक्रम लागतो तो उत्तम फोटो असलेल्या स्थळांचा. नोकरीच्या वेळी उत्तमरीतीने बनविलेला, सुटसुटीत व आकर्षक बायोडाटा जसा प्रभावी ठरतो तसा समोरील पक्षाच्या अपेक्षांचा विचार करून काढलेल्या फोटोंचा. कुठल्याही विवाह्संस्थेतील स्थळे निवडताना मुले-मुली (व पालक) आपल्या अपेक्षेनुसार समोर आलेल्या स्थळांपैकी प्राधान्य देतात ते उत्तम फोटो असलेल्या स्थळांना. 

इतकेच नव्हे तर आपण विवाहसंस्थेत जमा केलेल्या किंवा संस्थेच्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या फोटोवरून आपली प्रतिमा समोरील व्यक्तीच्या मनात निर्माण होते. उत्तम शिक्षण व उत्पन्न हे जरी मुलींचे प्राधान्य असले तरी केवळ आणि केवळ तेच पूर्ण करून लग्न जमविले जात नाही. 

बरेचदा अनेक मुले अत्यंत कॅज्युअली काढलेले फोटो स्थळाच्या माहितीसोबत देतात. त्यात मित्रांसोबत पिकनिकचे, बाईकवर बसलेले, आपल्या मोटारीच्या सोबतचे, एखाद्या समारंभातील विचित्र हावभाव असलेले, इत्यादी. अश्या फोटोवरून आपले लग्नाविषयीचे अ-गांभीर्य, एका मुलीचा पती आणि एका कुटुंबाचा जावई होण्याच्या पात्रतेबद्दल आणि आपल्या मानसिक (अ)परिपक्वतेबाबत (मॅच्युरीटी) प्रश्न निर्माण होऊ शकतो ह्याचा बरेच मुले विचार करीत नाही. प्रत्येक मुलीची समंजस, विचारी व जबाबदार साथीदाराची अपेक्षा असते आणि आपल्या फोटोतून आपली काय प्रतिमा निर्माण होते ह्याचा विचार केल्यास  लग्न जमण्याच्या शक्यता अनेक पटींनी वाढतात. आपल्या उत्तम व विचारपूर्वक काढलेल्या, सुस्पष्ट फोटोतून आपल्या स्थळासाठी अनेकांकडून चौकशी केली जाऊ शकते हे मुलांनी व त्यांच्या पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. 

ह्याबाबतीत आपलं माणूस विवाहसंस्थेच्या सदस्यांना आम्ही मोफत मार्गदर्शन करतो. मग ह्यासाठी स्टुडीओमधील फोटोंचीच गरज आहे का? काही जणांना प्रत्यक्ष व्यक्ती कसा आहे हे बघायचे असते त्यावेळी अशा actual फोटोंचा उपयोग होतो वगैरे प्रश्न काही जण विचारतात. त्यासाठी ह्यालेखाच्या शेवटी दिलेल्या सूचना उपयोगी पडतील.

मुलींच्या बाबतीत विचार करताना बरेचदा उत्तम शिक्षण व चांगले उत्पन्न असलेल्या मुलांची, लग्नानंतर नोकरी केली तरी किंवा नाही केली तरी चालेल अशी भूमिका असते त्यावेळी स्वभाव, कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादींसोबत अर्थातच फोटोलाही महत्त्व प्रथम दिले जाते. ह्याबाबतीत काही मुली व पालक स्टुडीओमध्ये जाऊन कृत्रिमरीत्या आकर्षक दिसणारे फोटो काढून विवाहसंस्थेत देतात व प्रत्यक्ष व्यक्ती मात्र अगदी तशीच नसल्याचे आढळल्यावर येणारा नकार मुली, पालक, मध्यस्थ नातेवाईक सर्वांनाच मानसिक ताण देऊन जातो. तसेच पुणे-मुंबई-ठाणे-नवी मुंबई येथील मुली आपण मॉडर्न आहोत असे भासवण्याच्या प्रयत्नांत दैनंदिन आयुष्यातील फोटो न देता, क्वचितप्रसंगी काढलेले फोटो स्थळाच्या माहितीसोबत देतात व अनेकदा मुलाच्या पालकांकडून नाकारल्या जातात.

ह्या सर्व मुद्यांचा विचार करता खालील काही सूचना मुला-मुलींनी विवाह्संस्थेत फोटो जमा करताना किंवा अपलोड करताना करावा. त्याशिवाय आपलं माणूस विवाहसंस्थेच्या सर्व सदस्यांना ह्यासंबंधी मोफत मार्गदर्शन उपलब्ध आहे.


  • सर्व-प्रथम आपण काढलेले फोटो चांगल्या प्रतीच्या कमेरातून काढलेले व योग्य फोटो-साईझमधील असावेत. ते अस्पष्ट, धूसर, घरगुती मोबाईलवरील, खूप लहान आकाराचे अशा प्रकारचे नसावेत.
  • आपली प्रत्यक्ष लाइफस्टाईल दर्शविण्यासाठी काढलेले फोटो खरेपणा दाखवणारी असावी. असे फोटो हसतमुख असले तरी उत्श्रुंखल (अविचारी) हावभाव दर्शविणारे नसावेत.
  •  आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत काढलेल्या फोटोतील आपले फ्रेंड्स कसे आहेत ह्यावरून देखील आपली चांगली/ वाईट प्रतिमा बघणाऱ्याच्या मनात निर्माण होते, ह्याचा विचार करून फोटो वापरावेत.
  • शक्यतो स्टुडीओमधील फोटो न वापरता चांगल्या फोटोग्राफरकडूनच परंतु सामान्य वातावरण, नैसर्गिक प्रकाश, घर/कार्यालय/बाग इ. पार्श्वभूमी वापरून फोटो काढावेत.
  •  फोटो काढतेवेळी अति-जास्त प्रमाणात मेक अप करू नये. सर्वसाधारण प्रसन्न स्थितीमधील फोटो काढावेत.
  •  शक्यतो आपल्या नेहमीच्या, रोजच्या वेशभूषेतील फोटो लग्नासाठी वापरावेत; वेगळ्या, विशिष्ट वेशभूषेतील फोटो आपली प्रत्यक्ष प्रतिमा दाखवू शकणार नाही.
  •  विवाहाच्या कारणासाठी कधीही पासपोर्ट-साईझ फोटो वापरू नयेत.


आपलं माणूस विवाह्संस्थेतील सदस्य ह्यासंबंधीचे मार्गदर्शन मोफत आमच्या ग्राहक-सेवा क्रमांकावर मिळवू शकतात. लक्षात घ्या आपला प्रभावी, परिणामकारक व विचारपूर्वक काढलेला फोटो आपलं लग्न जमविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो आणि आपल्या स्थळासाठी येणारी चौकशी वाढवू शकतो.

आपलं माणूस विवाहसंस्था आपल्या त्वरित शुभ-विवाहाची व सुखी-सहजीवनाची कामना करते.


सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी....
आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com



ग्राहक सेवा क्रमांक-  98606 82967 आणि 738 7171 483
वेळ: स. 10 ते सायं 6 | रविवार सुरु



आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha

गुगल ग्रुप जॉईन करा :
https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus

Tuesday, March 31, 2015

“हल्ली मुलीच मिळत नाही हो?” सत्य किती आणि वास्तव काय?

काही वर्षांपूर्वी पुण्यात सावित्रीबाई फुले ह्यांनी अपार मेहनतीने मुलींसाठीची पहिली शाळा सुरु करून स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या झाडाची बीजं पेरली. त्यांचा स्वागतार्ह प्रयत्नांना चांगली फळं आली आहेत. आज त्या बीजांचा वृक्षच नाही तर वटवृक्ष तयार झाला आहे आणि आज उच्चविद्या विभूषित मुली म्हणजे सावित्रीबाईंना खरी आदरांजली आहे. पण त्यानंतर अपेक्षित होता तो केवळ तांत्रिक बदल नव्हे तर मुलींची, त्यांच्या पालकांची आणि पर्यायाने समाजाची मानसिकता बदलणे आणि सुधारणे.

आज आम्ही विवाहसंस्थेत नावनोंदणी करताना मुलींच्या जोडीदाराविषयी अपेक्षांचा अभ्यास करतो आणि लक्षात येते की मुली 
१) लग्नाच्या बाजारात आपली “व्हॅल्यू” वाढविण्याकरिता मोठ्या पदव्या घेतात म्हणजे चांगले स्थळ मिळेल, ह्यातील 60% हून अधिक मुली लग्नानंतर गृहिणींचे काम करतात 

२) मोठ्या शहरातील उच्च शिक्षित मुली लग्नानंतर नोकरी करतात त्यापैकी केवळ 20% मुली ह्या कुटुंबाची आर्थिक गरज म्हणून इतर मुली ह्या ‘आपल्या मनाप्रमाणे खर्च’ करण्यासाठी कमवित्या होतात.

मूळ प्रश्न असा आहे की मुली उच्च शिक्षण घेऊन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे असं विचार करतात पण – “गरज पडली तर!!” ह्या मुख्य अटीवर. आणि आजही मुली ह्या -आपण जरी खूप शिकलेलो असलो तरी आपला नवरा आपल्यापेक्षाही जास्त शिकलेला असावा, आपल्यापेक्षाही जास्त पगार असणारा हवा हीच मानसिकता मनात बाळगून जगतात. म्हणजे काय? तर पुरुष हाच कुटुंबप्रमुख असावा, त्याने जास्त कमाई करावी, त्याचेच शिक्षण जास्त असावे इत्यादी इत्यादी. ह्याच अपेक्षांनुसार मुलींचे आणि त्यांच्या पालकांचे लग्नासाठी ‘वर-संशोधन’ चालू असते. उदाहरणार्थ – साधारण शहरातील मुली/पालक मोठ्या शहरातील मुलगा बघतात; नाशिक, नगर, औरंगाबाद, कोल्हापूर येथील सुशिक्षित मुलींना ‘पुण्यातीलच’ (त्यातही शक्यतो इंजिनियर/IT मधील) मुलगा हवा असतो आणि पुण्या-मुंबईतील उच्च शिक्षित मुली तर मुलगा बघायला लागण्यापूर्वीच आपला “पासपोर्ट” तयार ठेवतात. म्हणजे पुन्हा मानसिकता तीच! आपला पती आपल्यापेक्षाही जास्त शिकलेला असावा, आपल्यापेक्षाही जास्त पगार असणारा आणि आपल्यापेक्षा सर्वार्थाने “उच्च” असावा.

आणि त्याहून गंमत म्हणजे ह्यातील सर्वच मुली उच्च-शिक्षित असतात असं नाही तरीही विभागानुसार वर म्हटल्याप्रमाणे अपेक्षा तीच! परवा नाशिकमधील एक सदगृहस्थ आपल्या मुलीसाठी मुलगा बघत होते आणि त्यांनाही रीतीप्रमाणे ‘पुण्यातील’, ‘इंजिनियर’, ‘चांगलं पॅकेज असलेला’ वगैरे मुलगा हवा होता. मी सहजच त्यांचा फॉर्म बघितला आणि विचारले मुलीचं शिक्षण काय झालंय तर BA चे (MBA नव्हे) 2 विषय फक्त (?) राहिलेत म्हणाले. म्हणजे मुलगा ‘असाच’ हवा म्हणणाऱ्या मुली व पालकांनी थोडी आपली योग्यताही तपासायला हवी.  

अर्थात, प्रत्येक केसमध्ये असाच प्रकार होतो असे नाही परंतु सर्व काही होऊन मानसिकता मात्र तीच राहते आणि त्यामुळे लग्नाला उशीर होणे, मुल उशिरा होणे, वगैरे गोष्टी क्रमप्राप्तच असते. नंतर लग्न लवकर जमतच नाही म्हटल्यावर बऱ्याच मुलींच्या/पालकांच्या  अपेक्षा जमिनीवर येतात आणि मग ‘ठीक आहे असाही चालेल..तसाही चालेल’ अशा तडजोडी  सुरु होतात. दुर्दैवाने तोपर्यंत बरीच उत्तम स्थळं हातून सुटलेली असतात.

इकडे वर-पक्ष (इंजिनियर वा ITत नसलेला) हल्ली मुलींचं प्रमाणच कमी झालंय, मुलीच मिळत नाहीत वगैरे सांगत असतात. प्रत्यक्ष सत्य काय आहे? मुलींचं प्रमाण कमी झालंय? अजिबातच नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा विचार करता दर हजार पुरुषांमागे 900हून अधिक स्रिया आहेत. मुळात मुलींचं प्रमाण कमी झालेलं नाही त्यांच्या अपेक्षांचं हवेत जाण्याचं प्रमाण मात्र वाढलंय. 

एक साधारण सर्वे केला तर ह्या उच्चशिक्षित मुली लग्नानंतर पुरुषाच्या बरोबरीने कुटुंबाचा आर्थिक बोजा उचलतात – केवळ ‘गरज असतील तेवढ्याच’! 
इतर किती उच्चशिक्षित मुली, आपण इतके  उच्चशिक्षित  आहोत तर मुलांना ट्युशनची गरज नाही असे म्हणतात? अगदीच मोजक्या! म्हणजे ह्यांच्या पदव्यांचा मुलांना शिकविण्यासाठीही संपूर्ण उपयोग नाही. 
बरं इतर किती उच्चशिक्षित मुली लग्नानंतर जरी नोकरी/व्यवसाय करीत नसल्या तरी इतर सर्व आर्थिक बाबींची एकहाती जबाबदारी घेतात (गुंतवणूक, कर्जे, विमा, बँकव्यवहार इ.)? पुन्हा अगदी मोजक्याच!

मग आता विचार करण्याची वेळ आली आहे विवाहेच्छुक मुली व त्यांच्या पालकांची की आपल्या अपेक्षा गगनाएवढ्या उंच करण्यापूर्वी आपली योग्यता, कुटुंबासाठीची उपयुक्तता नीट तपासून बघण्याची. अन्यथा नंतर तडजोड करून मुली स्वतःचे, पालक आपल्या मुलींचे एका अर्थाने नुकसानच करीत नाहीत का? पण लक्षात कोण घेतो? 

परवा अशाच एक वयस्कर बाई आपल्या इंजिनियर-नसलेल्या मुलाच्या बाबतीत चिंतीत होत्या. मी त्यांना वास्तविकता समजावून सांगून धीर दिला की – मुली 25-26 वर्षांच्या असताना ‘इंजिनियर’ची वाट बघतात, 28-29 वर्षे झाले की मग डिप्लोमावालाही चालतो, 30-32 वर्षे झाली की कुठलाही बरा कमावता पोस्ट-ग्रॅज्यूएट चालतो त्यामुळे तुम्ही चिंतीत होऊ नका.

मुलींची संख्या कमीही झालेली नाही, मुली मिळत नाही असेही नाही; फक्त वाट बघावी लागते वधू-पक्षाच्या अ-वास्तव अपेक्षा जमिनीवर येण्याची!

धन्यवाद!!!


सुयोग्य जोडीदाराची निवड, विवाहविषयक मार्गदर्शन ह्यासाठी

आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com

आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha

गुगल ग्रुप जॉईन करा : https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus

Thursday, March 12, 2015

“हवा तस्सा” लाईफ पार्टनर कसा निवडू?

सर, अहो काय करावं? समोरच्यांच्या एकतर अपेक्षा खूपच वाढलेल्या आहेत आणि मी तर आता स्थळं बघून बघून कंटाळलो आहे, तरी अजून कुठे लग्न जमतच नाहीये...वैतागलेला चिन्मय त्याच्या भावना बोलून दाखवत होता. त्यावेळी मी चिन्मयला काही उपायांच्या चार गोष्टी सांगितल्या ज्यामुळे त्याचं सुयोग्यआणि अगदी मला हवा तस्साजोडीदार निवडणं माझ्या मते सोपं झालं असावं. पण प्रश्न केवळ एका चिन्मयचा नाहीये. अशा किती तरी चिन्मय आणि चैताली आपल्याला भेटत असतात. लग्न जुळणे ही खरी समस्या आहे की हवा तस्साजोडीदार न मिळणं ही? माझ्या मते आजच्या तरुणाईला दुसरा प्रश्न जास्त सतावतो आहे आणि पर्यायाने त्यांच्या पालकांनाही!

आज शिक्षणाच्या, उत्पन्नाच्या, तंत्रज्ञानाच्या आणि त्या अनुषंगाने जीवनशैलीच्या कक्षा वेगाने विस्तारल्या आहेत आणि त्या नाकारून किंवा त्याला दोष देऊन काहीही उपयोग होणार नाहीये. गरज आहे ती ही बदलेली जीवनशैली आणि घराच्या भाषेत सांगायचं तर आजचं युगस्वीकारण्याची, त्याला सकारात्मक दृष्टीने बघण्याची मानसिकता विकसित करण्याने. आणि हो, ती अशी आपोआप होणारही नाही, आपले विचार बदलूनच होईल.

आज मुलींना उच्च-शिक्षित, लठ्ठ पगार असलेला, स्वतःचे घर/फ्लॅट असलेला आणि सहसा कुठलीही कौटुंबिक जबाबदारी नसलेला मुलगा सामान्यपणे जोडीदार म्हणून हवा असतो. मुलांना चांगली शिकलेली, नोकरी करणारी+ घर सांभाळणारी, मनमिळाऊ, वगैरे... अशी मुलगी हवी असते. अर्थात, ह्या अपेक्षा प्रातिनिधिक असून व्यक्तीनुसार त्या बदलत असतातच. ह्याच्या जोडीला पालकांच्याही काही अपेक्षा असतात. खास करून सुनेच्या बाबतीत. जास्तीत जास्त गुणसंपन्न सून त्यांना हवी असते. हे सर्व बघायलासुरु केल्यावर विचारात घेतले जाते आणि दिवस जसे-जसे पुढे जातात आणि लग्न मात्र जमत नाही तस-तशी ही अपेक्षांची यादी छोटी व्हायला लागते. मग अमुक नसेल तरी चालेल, तमुक असेल तरी चालेल अशा तडजोडी सुरु होतात. मुळात आपली वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थितीचे व्यवस्थित मूल्य ओळखता आहे तर ती अपेक्षांची यादी मोठी झालीच नसती. नव्हे, आज करीत असलेल्या तडजोडींची सुरुवातीपासून तयारी असती तर किती तरी चांगली स्थळे हातची गमावली नसती. पण उशिरा सुचलेले शहाणपण आपली फीस वसूल तर करतेच. आणि तडजोडीचे फळ (व स्थळ) पदरात टाकून जाते.

तसाच ह्या ब्लॉगच्या विषयाला अनुसरून आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलेली स्थळे आपण किती निरखून, पारखून, तपासून घेतो ह्यावरही वैवाहिक जीवनाची बीजं रोवलेली असतात. वेळीच घेतलेली तसदी नंतरचा बराचसा त्रास कमी करते हे वेगळे सांगण्याची तशी आवश्यकता नाही पण बरेचदा आपण भावनेच्या भरात, नातेवाइकांच्या प्रभावाखाली वा दडपणापायी, कधी जास्त खोलात न जाता घाईघाईने निर्णय घेऊन टाकतो. आजच्या शहरी, खास करून पुणे, मुंबई, ठाणे ह्या भागात अशी गोष्ट अभावानेच घडते असं गैरसमज ठेवण्याचे कारण नाही आणि त्याचा कागदोपत्री पुरावा म्हणजे वैवाहिक त्रासाच्या सर्वात जास्त तक्रारी आणि घटस्फोटाचे अर्ज ह्याची संख्या वरील पुणे-मुंबई भागातून जास्त आहे. तोच प्रकार उर्वरित माहाराष्ट्रात घडतो. फरक इतकाच कि उर्वरित महाराष्ट्रात जागरूकता कमी असल्यामुळे हवा तस्साजोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य व भान तेथील तरुणाईला कमी असते. आणि असली तरी त्यांच्यातील स्वतःच्या लग्नाविषयीची भूमिका, कुटुंबामध्ये मत मांडण्यासाठी लाजण्याची (?) प्रवृत्ती इ. अ-जागरूकतेमुळे पर्यायाने त्यांना भोगावा लागणारा त्रास चुकत नाही.

त्या पुढील टप्पा म्हणजे, आलेल्या स्थळांशी वधू अथवा वराने प्रत्यक्ष किमान 2 वेळा सविस्तर बोलल्यानंतर होकाराचा निर्णय घ्यावा. पैकी प्रथम बोलणी फोनवर करण्यासही हरकत नाही. उलट ते जास्त सोयीचे आहे जेणेकरून इतर सर्वांचा वेळ व श्रम त्यामुळे वाचतील. ह्या दोन संवादांमध्ये वधू-वरांनी आपली कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती ह्याची योग्य ति सर्व माहिती समोरच्याला द्यावी आणि न-लाजता/न-घाबरता त्याचीही ही सर्व माहिती विचारून घ्यावी. ह्या माहितीमध्ये, सांगण्यामध्ये काही विसंगती, संशयास्पद किंवा अवास्तव बाब आढळल्यास त्याची योग्य प्रकारे शहानिशा कारून घ्यावी. त्याचा मार्ग ज्याने-त्याने परिस्थिती पाहून ठरवावा. लग्नानंतर होणाऱ्या संभाव्य त्रासापासून स्वतः व कुटुंबाला मुक्त करण्यासाठी सुरुवातीलाच ही घेतलेली तसदी नक्कीच फायदा देऊन जाते आणि वैवाहिक जीवन उजळ व समाधानी करण्यात साहाय्यभूत होते.

उदा. आपल्या मुलाला CBSE व्यवस्थेच्या शाळेत घालावे कि state boardच्या ह्या साध्या विषयावर एकमत नसलेली जोडपी विवादांचा वारसा मुलांना देत असताना बघायला मिळते. ह्याचे मूळ कारण हेच कि लग्न ठरण्यापुर्वी एकमेकांच्या विचारांची, जीवनशैलीची आणि भविष्याबाबत मतांची स्पष्ट कल्पना जोडीदाराला न देणे किंवा त्याचे महत्त्व न जाणणे. अशा प्रकारचे छोटे छोटे वाद मोठे स्वरूप कधी घेतात आणि ते प्रत्येक बाबतीत कधी घडायला लागतात हे त्या दोघांनाही समजत नाही. मुळात असा विवाहपूर्व संवाद साधणे म्हणजे माझ्या अटी अशा आहेत...असे सांगणे अजिबातच नव्हे तर त्या व्यक्तीला आणि त्याच्या एकंदर परिस्थितीला जाणून घेणे. त्या माहितीची आपल्या अपेक्षांशी तपासणी करणे, जुळवणूक करणे होय. आणि ती जर शक्य नसेल किंवा वेगळी असेल तर सौजन्यपूर्वक तसे कळविणे.


अर्थातच ह्या सर्व गोष्टींचा विचार करता अगदी हवा तस्साजोडीदार मिळणे ही तशी वास्तविकत: अवघडशी गोष्ट बऱ्याच अंशी सोप्पी होईल आणि पर्यायाने आपलं माणूससोबत असल्याने पुढील वैवाहिक जीवनही...!

सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी....
आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com



ग्राहक सेवा क्रमांक-  98 60 68 29 67





आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha

गुगल ग्रुप जॉईन करा :
https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus