Monday, December 21, 2015

शुभमंगल करताना जरा "सावधान'




प्रत्येक वर व वधूच्या आयुष्यातील शुभविवाह हा एक मंतरलेला क्षण असतो. लग्नाच्या या रेशीमगाठीत अडकताना अथवा बोहोल्यावर चढताना यौवनावस्थेतील भिरभिरणारं हे तरुण तन व मन एकमेकांच्या प्रेमालाप, सहवासासाठी आणि मिलनासाठी आसुसलेलं असतं. हा क्षण म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक नाजूक टप्पा, की ज्या क्षणांसाठी त्यांनी लग्नाच्या बेडीत अडकताना नानाविध रंगीबेरंगी स्वप्नं पाहिलेली असतात.
 
लग्न म्हणजे वयात आलेल्या प्रत्येक मुलामुलीच्या जीवनातील एक अत्यंत नाजूक वळण किंवा टर्निंग पॉइंटच म्हणू या. फुलपाखरी स्वच्छंदी जीवन अनुभवल्यानंतर घरात मुलामुलीच्या लग्नाचा विषय निघतो. आपल्या मुलाला अथवा मुलीला सुयोग्य जोडीदार निवडताना बऱ्याच पालकांची तारेवरची कसरत होत असते. नाना तऱ्हेचे शेकडो उपाय केले जातात, लग्न जमविण्यासाठी कुंडलीची जुळवाजुळव केलेली असते, आपल्या सोन्यासारख्या मुलासाठी अथवा मुलीसाठी पाहुण्या-राऊळ्यांचे उंबरे झिजवलेले असतात. अर्थातच विवाहाच्या या उंबरठ्यावर आपल्याला मनासारखाच जोडीदार मिळावा, अशी प्रत्येक मुलामुलीची मनोमन इच्छा असते. 

 
असा सुयोग्य व परिपूर्ण जोडीदार निवडताना सावधानता बाळगणंही महत्त्वाचं ठरतं. प्रथमतः आपण आपला मुलगा असो अथवा मुलगी, तिचं किंवा त्याचं लग्नाचं जरी वय झालं तरी त्यांच्यात सुखी व आनंदी संसार करण्याची बौद्धिक कुवत आली आहे की नाही, हे पाहणंही गरजेचं आहे. आपले नातेसंबंध, नातीगोती, स्वभाव, मित्रपरिवार, शिक्षण, राहणीमान आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपली आर्थिक मालमत्ता व कौटुंबिक स्थितीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. काही वेळा काही मुलामुलींना शारीरिक आजार, व्यंग अथवा आनुवंशिक शारीरिक त्रास असतो. घरची मंडळी तो कळू देत नाहीत, त्यासाठी लग्नापूर्वी रक्तगट व आरोग्यतपासणी करून घेणं गरजेचं असतं; परंतु आपल्या अपेक्षेप्रमाणं योग्य आणि आपल्याला साजेसा जोडीदार मिळणं तसं अवघडच असतं. त्यामुळं कुठंतरी तडजोड होतेच. जोडीदाराच्या बाह्यसौंदर्य किंवा आर्थिक मिळकतीपेक्षा तो किंवा ती प्रापंचिक जबाबदारीस पात्र आहे की नाही, त्याबद्दल चौकशी करून अत्यंत शांतपणे, समंजसपणे आणि कोणत्याही प्रकारची घाई न करता निर्णय घ्यायला हवा.
पालकांनीही थोडीशी जागरुकता दाखवून आपल्या मुलामुलींबद्दल जास्त अपेक्षा बाळगू नयेत, मानापानाच्या नावाखाली अवाजवी मागण्या करू नयेत. हुंडा देणं व घेणं कायद्यानं गुन्हा आहे, याची जाणीव ठेवावीच. "चट मंगनी पट शादीया उक्तीप्रमाणं पालक जबाबदारीतून मुक्ती मिळण्यासाठी साखरपुड्यातच लग्न लावून देतात किंवा "पाहायला म्हणून आले आणि लग्न लावून गेले,‘ अशा काही गोष्टी धोकादायक ठरतात. आपल्या गुणी अपत्यांचा संसार सुखी होण्यासाठी मुलाची अथवा मुलीची सवय, स्वभाव, वर्तणूक, शारीरिक आजार आणि वयातील अंतर इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी माहीत करून घेणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता, भावनांच्या आहारी न जाता, आपलं कुटुंब व समाज यांचा विचार करून अनुकूल व सुयोग्य शरीराची व मनाची परिपक्वता झाल्यावरच लग्नासाठी आपण होकार द्यावा आणि मगच प्रेम व स्नेहरूपी अक्षता हळदीच्या अंगावर पाडून घेत म्हणावं... "शुभमंगल सावधान"... 

 

विवाहासाठी सहभाग मुला-मुलींचा विवाह ठरविण्याच्या सध्याच्या पद्धतीत प्राथमिक निवड मुला-मुलींचे पालक करतात. पत्रिका पाहणे, फोटो इत्यादी गोष्टी पालकच करतात. मुलांचा किंवा मुलींचा प्रत्यक्ष सहभाग पाहण्याच्या कार्यक्रमावेळीच येतो. आजकालच्या धावपळीच्या युगात हे सर्व करायला मुला-मुलींना वेळ नसतो. कारण त्यांचे सर्व लक्ष करिअरकडे असते. पण यामुळे होते काय, की आई-वडिलांना योग्य वाटतात तेवढीच स्थळे निवडली जातात. मुला-मुलींच्या अपेक्षांबद्दल त्यांना कल्पना असतेच असे नाही. त्यामुळे थोडासा विसंवाद होण्याचा प्रकार घडतो. मुला-मुलींचे पर्याय पालकांच्या चष्म्यातून गाळलेले असल्याने ते मुला-मुलींना भावतातच असे नाही. त्यामुळे पाहण्याचे कार्यक्रम होऊनही पसंती होत नाही. खरे तर मुला-मुलींनी लग्न ठरविणे ही पालकांइतकी स्वतःची जबाबदारी मानायलाच हवी. कारण अधिकाधिक मुले-मुली पुढे येऊन स्वतःचा जीवनसाथी निवडण्यात सुरवातीपासून सहभागी होतील, तेव्हा योग्य प्रकारे निवड होऊ शकेल. कारण आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी नुसते प्रेमच नव्हे, तर मनेही जुळावी लागतात, विचार एकमेकांशी मिळते असावे लागतात, तडजोडीची तयारी लागते. परस्परांच्या सुखासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. सहजीवन तर सुंदर असतेच; पण स्वतःचा व्यक्ती म्हणूनही विकास तितकाच महत्त्वाचा असतो.

आपलं माणूस विवाहसंस्था आपल्या त्वरित शुभ-विवाहाची आणि सुखद सह-जीवनाची कामना करते.


सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी....
आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com
 

ग्राहक सेवा क्रमांक:  98-606-82-967 आणि 738-7171-483
वेळ: स. 10 ते सायं 6 | रविवार सुरु



आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/ 

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha 

गुगल ग्रुप जॉईन करा :
 https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus